बीड: प्लॉटची फेरफार नोंद घेण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याकडील मदतनीसला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ५ ऑगस्ट रोजी केली.
शेख खमर शेख महेमूद (४८,रा.तेलगाव रोड, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. बीडमधील पिंगळे तरफ सजाच्या तलाठ्याकडे तो मदतनीस म्हणून काम करतो. तक्रारदाराने पिंगळे तरफ सज्जातील एक प्लॉट खरेदी केला होता. त्याची फेरफार नोंद करुन देण्यासाठी मदतनीस शेख खमर याने २६ मे २०२२ रोजी तीन हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबी कार्यालयात धाव घेत कैफियत मांडली. त्याच दिवशी लाच मागणी पडताळणी केली गेली.
मात्र, संशय आल्याने मदतनीस शेख खमर याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. शिवाय तक्रारदाराने देखील फिर्याद देण्यास नकार दिला. त्यामुळे उपअधीक्षक शंकर शिंदे ,अमंलदार सुरेश सांगळे, भारत गारदे,अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे यांनी ५ ऑगस्ट रोजी शेख खमरला अटक केली. त्याच्याविरुध्द शंकर शिंदे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्याच लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.