बीड : खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाइन नोंद करण्यासाठी अमित नाना तरवरे (वय ३२, रा. नाईकनगर तांडा, गेवराई) या तलाठ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, हाच तलाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही केली आणि संप मिटून आठवडा होण्यापूर्वीच त्याने लाचही मागितली. त्यामुळे या तलाठ्याविरोधात सध्या सोशल मिडीयार संताप व्यक्त होत आहे.
अमित तरवरे हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वीच तो तलाठी म्हणून नोकरीला लागला होता. सध्या तो गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे; परंतु त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाइन नोंद करण्यासाठी तरवरे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. याची तक्रार एसीबीकडे येताच गेवराई शहरातीलच नाईकनगर तांडा भागात असलेल्या खासगी कार्यालयात एसीबीने सापळा लावला. पैसे स्विकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी, सूरज सांगळे केली होती. दरम्यान, त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
संपात सरकारविरोधात घोषणाबाजीजुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यात हा अमितही सहभागी होता. एवढेच नव्हे तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही याने केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संप काळात हेच शासकीय कर्मचारी सोशल मिडीयावर ट्रोल झाले होते. यांना कशाला हवी पेन्शन? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. काही कर्मचारी सर्रास लाच घेतात, असेही नेटकऱ्यांचे म्हणणे होते. हा ट्रेंड सुरू असतानाच हा गेवराईचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे तो आता आणखीनच नेटकऱ्यांच्या निशान्यावर आला आहे.
पोलीस कोठडीत रवानगी३ हजार रूपयांची लाच घेताना तलाठी लोकसेवकाला पंचासमक्ष पकडले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा तपास सुरू आहे.- अमोल धस, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागी बीड