आष्टी : ई- पीक पाहणी ॲपद्वारे नोंद घेण्याबाबत तहसील कार्यालयाने कृषी सहायकांना आदेशित केले आहे. मात्र, कृषी सहायक संघटनेने हे काम नाकारले आहे.
यासंदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल यंत्रणा ई- पीक पाहणीचे संपूर्ण काम सोयीस्कररीत्या कृषी सहायकांकडे लादत असल्याचे दिसते. कृषी सहायक अगोदरच विस्तार योजना, हंगामी पीक प्रात्यक्षिके, विस्तार प्रकल्प अहवाल, प्रशिक्षण फळबाग योजना, पीएम किसान, तुषार, महाडीबीटी शेतकरी योजना, एमटीएस, शेतकरी अपघात विमा योजना, सांख्यिकी, कृषी सेवा केंद्र नवीन गुणनियंत्रण विभागाच्या विविध योजनांची तांत्रिकदृष्ट्या अंमलबजावणी जबाबदारी, अनेक ॲप्सच्या माध्यमातून कृषी सहायकांवर आहे. यासोबतच ई- पीक पाहणीचे अतिरिक्त काम करणे हे कृषी सहायकांना जाचाचे ठरेल व प्रत्यक्ष काम करणे शक्य होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, साप्ताहिक पीक पेरणीचे अहवाल नजर अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे दिला जाईल तसेच प्रचार व प्रसिद्धीचे काम कृषी सहायकांच्या मूळ सज्जात केले जाईल, असे कृषी सहायकांचे म्हणणे आहे. या निवेदनावर अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, शिवाजी सुबे, एस. बी. नरवडे, बी. आर. आठरे, व्ही. एम. पवार, एस. ए. चाकने, ए. एन. खोमणे, डी. एच. पोकळे, शोभा वामन, यू. के. बोर्डे आदी कृषी सहायकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.