संकरित सुधारित वाण खरेदी करत असताना शेतकरी कधी आपल्या अनुभवावरून पसंती नुसार बियाणे खरेदी करत असतो तर कधी अनुभवी शेतकरी ,कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला घेऊन बियाणे खरेदी करत असतो. पेरणी बरोबरच नंतरची मशागत खताची मात्रा तसेच औषधी फवारणी देखील गरजेप्रमाणे करत असतो. परंतु, एखादे वेळी बियाणांची फसगत होते,उगवण किंवा उत्पादनात मोठा फटका बसतो, अशावेळी संबंधित कंपनीला जाब विचारण्यासाठी काही गोष्टीचा पुरावा शेतकऱ्यांकडे असणे अत्यंत जरूरी असते .
शेतकऱ्यांनी बियाण्याचे पक्के बिल घेणे ,त्यावरील उत्पादित तारीख पाहणे , बियाण्याची पिशवी कोरड्या जागेत ठेवणे ,पिशवी खालच्या बाजूने फोडणे ,मुठभर बियाणे शिल्लक सांभाळून ठेवणे, बिल पिशवी व बियाणे पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवा. जेणेकरून गरज पडल्यास कंपनीला खात्री पटेल की बियाणे आणि पिशवी आपलीच आहे.
संभाव्य फसगत लक्षात घेता शेतकऱ्यांनी या गोष्टी विसरू नये, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी केले आहे .