बीड : गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्या दोन रोड रोमिओंविरूद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. मुलीने दिलेल्या जवाबावरून वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत.
गढी येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोडरोमिओंनी विद्यार्थिनीची छेड काढली होती. तसेच कॉल रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. बदनामीच्या भीतीने सदरील विद्यार्थिनीने आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या होत्या. यामुळे ती अत्यवस्थ झाली होती. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जवाबावरून सचिन व दीपक गाडे या दोघांविरूद्ध वेगवेगळे गुन्हे तलवाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तात्काळ गावात जावून सचिन व दीपक गाडेला बेड्या ठोकल्या. सायंकाळी पाच वाजता त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे बांगर म्हणाले.
आणखी एका पथकाची स्थापनाजिल्हा, तालुका तसचे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत एका छेडछाडविरोधी पथकाची स्थापना केली आहे. परंतु हे पथके सध्या सुस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे. तळवट बोरगावच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पथकांना कडक सुचना देत कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आणखी एका पथकाची नियुक्ती केली आहे. यामध्ये तीन पुरूष व तीन महिला पोलीस कर्मचारी असतील, असे श्रीधर म्हणाले.