बीड : जिल्ह्यात कोराेना चाचण्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत ७ लाख चाचण्या होणे अपेक्षित होते; परंतु केवळ २ लाखच चाचण्या झाल्या आहेत. याची टक्केवारी केवळ २९ आहे. या चाचण्या वाढविण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, तसेच नागरिकही चाचण्यांसाठी पुढे येत नसल्याचे चित्र जिल्ह्यात असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आष्टी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने विक्रम केला. या काळात व्यापारी, मोठी गावे येथे विशेष मोहीम राबवून कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यामुळे नंतरच्या काळात रुग्णसंख्या कमी झाली; परंतु आता आणखी कोरोना चाचण्या कमी झाल्याचे दिसत आहे. बीडमधील चाचण्यांबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे.
प्रधान सचिवांच्या पत्राला केराची टोपली
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बीड जिल्ह्याला दररोज २,२८० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु बीडमध्ये ५०० पेक्षा जास्त चाचण्या झाल्या नाहीत. सचिवांच्या पत्राला बीडमध्ये केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसते.
सीईओंनी घेतला आढावा
कोरोना चाचण्या वाढविण्याच्या दृष्टीने आता सूचना केल्या जात आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यांना योग्य त्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.
बीड अव्वल, तर पाटोद्याचा नीचांक
जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत चाचण्या करण्यात बीड तालुका अव्वल आहे. बीडमध्ये ५१ टक्के चाचण्या झाल्या आहेत, तर पाटोदा तालुक्यात उद्दिष्टाच्या केवळ १४ टक्के चाचण्या झाल्या आहेत. सर्वांत खराब कामगिरी पाटोद्याची आहे.
काय म्हणतात अधिकारी...
याबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनीही यापेक्षा वेगळे काही केले नाही, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार म्हणाले, चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांशी बोलून आणखी उपाययोजना केल्या जातील.
-----
तालुकानिहाय आकडेवारी
तालुकाउद्दिष्टचाचणीटक्का
बीड १,४१,०२० ७३,१०९ ५१.८४
धारूर २६,४८० ९,५९२ ३६.२२
अंबाजोगाई ८८,८९० ३०,८६७ ३४.७२
आष्टी ६७,४०० २०,४५३ ३०.३५
शिरूर ३१,०४० ७,८०९ २५.१६
वडवणी २६,१२० ६,४८६ २४.८३
केज ६८,१२० १५,८०६ २३.२०
परळी ८७,५२० १९,०९० २१.८१
माजलगाव ६८,९६० १४,२३० २०.६४
गेवराई ७३,६८० १२,९५७ १७.५९
पाटोदा ४२,५४० ६,०६३ १४.२५
एकूण ७,२१,७८० २,१६,४६२ २९.९९