बीड : महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी केंद्रातील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा नोंदविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर दिले आहे. मात्र, अनेक सेविका अल्पशिक्षित असल्याने अडचण निर्माण झाली आहे. मात्र, दहावी, बारावीपर्यंतच्या शिक्षित सेविका ही माहिती सहज व सुलभरीत्या भरत आहेत. पूर्वीच्या कॉमकेअर ॲपपेक्षाही पोषण ट्रॅकर सुलभ असून, केवळ नाव नोंदविताना इंग्रजीची अडचण येत आहे. त्यामुळे एकतर ॲपमध्ये नाव नोंदणीसाठी प्रादेशिक भाषेची सुविधा हवी किंवा बैठकांमध्ये बेसिक शिक्षणाचा ब्रीज कोर्स सेविकांसाठी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१) जिल्ह्यातील अंगणवाड्या - २९५७
एकूण अंगणवाडी सेविका - २८३२
२) पोषण ट्रॅकरवरील कामे
जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, शून्य ते सहा वर्षांपर्यंतचे लाभार्थी, लसीकरणाची नोंद, किशोरवयीन मुला-मुलींचे वजन, उंची, रोजचे पोषण भरण, टीएचआरची हजेरी आदी माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भरावी लागते.
३) मोबाइलची अडचण वेगळीच
अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामकाजाची नोंद करण्यासाठी रजिस्टरचा भार कमी करून मोबाइल दिले आहेत. मात्र, ही कामे करताना अनेकदा मोबाइल हँग हाेणे, मेमरी जास्त झाल्याने मोबाइल न चालणे, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बीटीएस टॉवर क्षमतेने काम करत नसल्याने, तसेच पावसाळ्यात रेंज मिळण्यास अडचणी येतात. त्यातच वैयक्तिक वापराऐवजी घरी इतर सदस्य, मुले मोबाइलचा वापर करतात.
४) आम्हाला इंग्रजी येते, अनेकींना मदतही
(दोन अंगणवाडी सेविकांची प्रतिक्रिया)
पोषण ट्रॅकरमध्ये नावे भरताना इंग्रजी अवगत असल्याने आम्हाला अडचणी येत नाहीत. काही जणींना अडचण येते हे खरे असले तरी फक्त सुरुवातीलाच इंग्रजी भाषेतून नोंद व नंतर भाषेचे पर्याय असल्याने हे ॲप सुलभच आहे. घरोघरी ॲण्ड्रॉइड मोबाइल असल्यामुळे वापरताना अडचणी येत नाहीत.
-सारिका कदम, अंगणवाडी सेविका, पाटोदा
--------------
पोषण ट्रॅकरवर नोंद करताना इंग्रजीमुळे सेविकांना अडचण येते. मात्र, हे प्रमाण केवळ दहा टक्केच आहे. अडचणी आल्यास सहकारी सेविकांना आम्ही मदतही करतो. लाभार्थ्यांची पहिली नोंद इंग्रजीत करावी लागते. उर्वरित माहितीसाठी ऑप्शन्स आहेत. माहितीदेखील कमी भरावी लागते. ॲप सुटसुटीत आहे.
-मंगल इथापे, अंगणवाडी सेविका, पांढरवाडी, ता. पाटोदा
------
जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप वापराची प्रत्यक्ष अंमलबजावणी विनाअडथळा सुरू आहे. या ट्रॅकरमध्ये फक्त एकदाच नावनोंदणी इंग्रजी भाषेतून करावी लागते. पुढील दैनंदिन कामकाज मराठी भाषेतून उपलब्ध आहे. नावनोंदणीदेखील मराठी भाषेतून भरण्याची सुविधा उपलब्ध करावी, यासाठी कार्यवाही सुरू आहे.
-चंद्रशेखर केकान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. बीड
--------------