बीड : वर्गातील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील एका जि. प. प्राथमिक शाळेचा शिक्षक राधाकृष्ण मरळकर याला मंगळवारी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले.
या जि. प. शाळेतील मुली शाळेत जात नव्हत्या. त्यामुळे पालकांनी याचे कारण शोधले असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पालक व ग्रामस्थांनी खात्री करून याबाबत तक्रार केल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी इतर केंद्रातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक तसेच शिक्षिका, अशा तीन सदस्यांची समिती नेमून चौकशी केली. चौकशीत मुलींचे जबाब घेतले असता सदर शिक्षक मुलांना वर्गाबाहेर जाण्यास सांगून वर्गातील मुलींशी असभ्य वर्तन करीत लंैगिक चाळे करीत असल्याचे उघड झाले. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर या शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याबाबत प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. मंगळवारी शिक्षक राधाकृष्ण मरळकर यास निलंबित करण्यात आले. त्याची वर्तणूक ही शिक्षकी पेशास अशोभनीय असून, जि. प. जि. स. वर्तणूक नियमांचा भंग करणारी असल्याने जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्याचे आदेश सीईओंनी दिले. निलंबन काळात त्यास आष्टी गटशिक्षण कार्यालय मुख्यालयात राहण्याचे निर्देश देण्यात आले.
फौजदारी दाखल करायाप्रकरणी सरपंचाचा तक्रार अर्ज व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानुसार सहशिक्षक राधाकृष्ण मरळकरविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले.