लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चारचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये दे, अन्यथा जाळून टाकीन अशी धमकी देत शिक्षिका पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अतुल सुखदेव भवर या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या आई-वडिलांवर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अतुल भवर हा सध्या पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाण्यात नेमणुकीवर आहे.याप्रकरणी वर्षा भवर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १२ वर्षापूर्वी त्यांचे लग्न अतुलसोबत झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे. २०१० मध्ये वर्षा यांना बीडच्या संस्कार विद्यालयात नोकरी लागली. या नंतर काही कालावधीतच अतुल यास दारूचे व्यसन लागले. त्यांनतर अतुल, त्याच्या आई-वडिलांनी वर्षा यांना सतत पगाराचे पैसे मागणे सुरु केले. त्यासाठी पत्नीस मारहाण सुरु केली. २०१२ मध्ये अतुल पत्नीला सोडून जालना येथे आई-वडिलांकडे राहण्यास गेला. नंतर प्रत्येक महिन्याला तो पैसे मागण्यासाठी वर्षा यांच्याकडे येत असे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अतुल मध्यरात्री अचानक पत्नीकडे आला व दारूला पैसे मागू लागला. वर्षा यांनी नकार देताच त्याने त्यांची दुचाकी पेटवून दिली. ही बाब वर्षा यांनी माहेरच्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी अतुलच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी चारचाकी घेण्यासाठी वर्षाच्या पगारावर कर्ज काढून द्या अन्यथा तिला नांदविणार नाहीत असे अतुलच्या आई-वडिलांनी ठणकावले. यानंतर वर्षाने बीडच्या महिला तक्रार केंद्रात अर्ज दिला परंतु तडजोड झाली नाही. सध्या वर्षा या अंकुशनगर येथे रहात असून अतुल तिथे अधून मधून येऊन व रस्त्यात अडवून वर्षा यांना पैश्याची मागणी करतो. गाडीप्रमाणे तुलाही जाळून मारीन अशी धमकी देतो, लाथाबुक्क्यांनी मारहाण करतो अशी तक्रार वर्षा यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली. यावरून अतुल सुखदेव भवर, सासू लता सुखदेव भवर आणि सासरे सुखदेव भिमलाल भवर या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
शिक्षक पत्नीचा छळ; पोलीस पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:12 AM