माजलगाव : एका शिक्षकाची सन २०१८ मधील थकित अर्जित पगार व इन्कमटेक्स रक्कम अदा करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय मुख्याध्यापक व गट साधन केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकले. एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास केली, या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षणाच्या आईचा घो करत तालुक्यातील शिक्षण विभागातील काही कर्मचारी शिक्षक विभागाला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. गलेलठ्ठ पगार असूनही आपली पैशाची भूक न शमणाऱ्या येथील केंद्रीय मुख्याध्यापक श्यामसुंदर दासरे व गट साधन केंद्रातील लिपिक काशिनाथ बोगुलवार यांनी संगनमताने आपल्याच विभागातील शिक्षकाला पगार काढण्यासाठी व अर्जित रजा पगार करण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार घडला. हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून या विभागात सर्रास सुरू होता. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तर कधी इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली येथील शिक्षकांना लुटण्याचे काम या दोघांकडून केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या विरोधात आवाज उठवण्याचे काम एका पीडित शिक्षकाने करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती तीन दिवसांपूर्वी दिली होती. याची शहानिशा एसीबी पथकाचे डीवायएसपी यांनी करून शुक्रवारी १२ वाजेच्या सुमारास केंद्रीय मुख्याध्यापक श्यामसुंदर दासरे यांना जि. प शाळा क्र.२ येथे १००० रुपयांची लाच घेताना तर गट साधन केंद्रातील लिपिक काशिनाथ बोगुलवार यांना ५०० रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पार पाडली. सदरील कारवाईने शिक्षणक्षेत्रात माजलेला सावळागोंधळ यानिमित्ताने उघडा पडला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.