बीड : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना म्हणून सेवा संलग्न केलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ डिसेंबरनंतर मिळत नसल्यामुळे सध्या या मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी कर्तव्य बजावताना आतापर्यंत चार शिक्षकांचा मृत्यू झाला. यापैकी दोन प्रस्ताव शासन दरबारी पाठवलेले आहेत.
गतवर्षी कोरोना संसर्ग पसरत असताना शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवासुद्धा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न केल्या होत्या. मागील वर्षी या मोहिमेत काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा कवच देण्याचा निर्णय झाला; मात्र हा निर्णय ऑक्टोबर २०२० पर्यंत काम करणाऱ्या शिक्षकांसाठी लागू हाेता. त्यानंतर हा निर्णय ३१ डिसेंबर २०२० पर्यंत काम करणाऱ्यांसाठी लागू केला; मात्र त्यानंतर या निर्णयाला वाढ मिळालेली नाही. त्यामुळे सध्या कोरोनाच्या उद्रेक काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांना विमा कवच नसल्याने लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. यातच मागील महिनाभरात जवळपास ९० शिक्षक कोराेनाबाधित आढळले आहेत. तर आणखी दोन शिक्षकांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
आरोग्य आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकही कोविड नियंत्रण मोहिमेत सहभागी आहेत. चेक पोस्टवर ड्युटीपासून गावात जनजागृती, सर्वेक्षण, तपासणी, लॉकडॉऊन काळात दुकानात पुढे सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी, रेशन दुकानांमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांना गर्दीच्या ठिकाणी काम करावी लागलेली आहे. सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी असलेल्या मिशन झिरो डेथ अभियानातही शिक्षकांचा प्रमुख सहभाग आहे. जीव धोक्यात घालून विविध २८ प्रकारच्या ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांवर मात्र एकीकडे कर्तव्य बजावण्याची वेळ तर दुसरीकडे विमा संरक्षण नसल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
---------
कोरोना साथरोग नियंत्रण मोहीम
९०५० शिक्षक
०४ शिक्षकांचा मृत्यू
०२ प्रस्ताव शासनाकडे
०० कुटुंबीयांना विमा मिळाला
----------
शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विमाकवच द्यायला पाहिजे. मे २००५ नंतर रूजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन नाही. दुर्दैवाने कोविड नियंत्रण कर्तव्य बजावताना मृत्यू ओढवल्यास त्यांच्या कुटुंबावर मोठे अरिष्ट येऊ शकते. झिरो डेथ मिशनमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना सुरक्षा साधने तसेच पूरक स्टेशनरी दिलेली नाही. - राजेंद्र खेडकर, राज्य संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.
--------
कोरोना काळात रोग नियंत्रणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच असायलाच पाहिजे. कारण सर्वेक्षण असो वा इतर कामे करताना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क येऊ शकतो. हे कार्य करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना विमा कवच महत्त्वाचे आहे. - बिभिषण हावळे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, बीड.
--------
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने व तळमळीने जोखिम पत्करून काम करीत आहेत; परंतु त्यांना आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाही. जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या शिक्षकांना विमा कवचद्वारे संरक्षण देण्याची गरज आहे. शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. - संजय ढाकणे, तालुकाध्यक्ष, शिक्षक सेना.
----------
कोविड साथरोग नियंत्रण मोहिमेत कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना सहनुभूतीपूर्वक मदत आवश्यक आहे. याबाबत निर्देशानुसार शासनस्तरावर प्रस्ताव पाठविले आहेत. शासनाच्या उचित निर्णयाची प्रतीक्षा आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)
----