लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : कोरोना आपत्तीकाळात शासन शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करणार आहे. याशिवाय सामाजिक जाणीवेतून धारूर तालुक्यातील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने मदत निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चार दिवसातच ३०० शिक्षकांनी चार लाखांचा निधी जमा केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, अजय बहीर, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी माझा तालुका माझी जबाबदारी... या भावनेतून मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत शिक्षकांनी मदत निधी जमा करण्याचा संकल्प केला आहे. ही मदत कोरोना आपत्कालीन परिस्थितीत बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास ऑक्सिजन सिलिंडर व इतर गरजेसाठी देण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या शिक्षक बांधवांना या उपक्रमास स्वच्छेने निधी द्यायचा आहे, त्यांनी शेख आसेफ, अर्जुन मुंडे, सुदर्शन काळे, रत्नाकर डोंगरे, सचिन कवडे, पालकर अनुरथ मुळे, श्रीराम आपेट, सुमंत सक्रांते, विकास अडागळे या शिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षक संघटनेच्या वतीने केले आहे.