बीड : शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. परंतु, यासाठीही चक्क शिक्षकच बेशिस्तपणे वागत असल्याचे जिल्हा रुग्णालयात दिसून आले. सेंटर व वेळ दिलेला असतानाही चाचणी करण्यासाठी गोंधळ घातला जात आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी राहून शाळेत ये-जा करणाऱ्यांकडूनही बीडमध्येच चाचणी करण्याचा हट्ट धरला जात आहे. याचे नियोजन करताना आरोग्य विभागच आजारी पडत असल्याचे दिसते.
२३ नोंव्हेंबरपासून ९ वी ते १२ पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शाळेत जाण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाने कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य विभागाने शिक्षण विभागाशी बोलून दररोज ८०० शिक्षकांची चाचणी करण्याचे नियोजन केले. तशी यादीही तयार करून सेंटरमधून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु या शिक्षकांकडून या सूचनांना खो दिला जात आहे. कॉल न येताही आणि वेळ व वार नसतानाही काही शिक्षक चाचणी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. विशेष म्हणजे, चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांकडून बेशिस्त होत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसून सर्रासपणे गर्दी केली जात असल्याने शिक्षकांबद्दल संताप व्यक्त होत आहे. ही परिस्थिती सांभाळताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी कोरोनाचे नियम पाळून इतरांसमोर एक आदर्श ठेवण्याची गरज आहे.
आयटीआयमध्ये कर्मचाऱ्यांसोबत वादजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांना नियम सांगूनही गुरूवारी बीडमधील आयटीआय परिसरात काही शिक्षकांनी गोंधळ घातला. आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी तात्काळ धाव घेत यादीतील लोकांची चाचणी करून इतरांना पोलिसांच्या मदतीने तेथून घरी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातही शुक्रवारी लांबच लांब रांग लागली होती. सामाजिक अंतर ठेवलेले दिसले नाही.
दररोज ८०० चाचणी करण्याचे नियोजन केलेले आहे. प्रत्येकाला वेळ व वार ठरवून दिला आहे. आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सूचना केल्या जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. शिक्षकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड