परळी (बीड): सन 2016 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करत तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप लावले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल सोमवारी लागला असून परळी न्यायालयाने या आरोपातून आमदार धनंजय मुंडे यांच्यासह सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि. ७/६/२०१६ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आक्रमक होत आंदोलकांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले होते. याप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तत्कालीन तालुका अध्यक्ष गोविंद फड, तत्कालीन शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तत्कालीन नगरसेवक राजेंद्र सोनी, वैजनाथ बागवाले यांच्यावर तत्कालीन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या तक्रारीवरून कलम १४३, ३४१,१८८, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी तपास करत प्रथमवर्ग न्यायालय परळी येथे दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी साक्षी पुरावे होऊन आमदार धनंजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, गोविंद फड, राजेंद्र सोनी, वैजनाथ बागवाले यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात ॲड. वैजनाथ नागरगोजे, ॲड. प्रदीप गिराम, ॲड. जीवनराव देशमुख, ॲड.एच.व्ही. गुट्टे यांनी काम पाहिले.