कडा- विनापरवाना वाळू उपसा होऊ नये आणि महसूल बुडू नये यासाठी महसूल प्रशासन सक्रिय झाले आहे. अशा वाहनांवर व माफियांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले असले तरी तहसीलदार यांना वेळोवेळी अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती देऊनही तहसीलदार याकडे कानाडोळा करत असल्याने वाळूतील अर्थकारणाचे पाणी कुठं मुरतंय हे समजत नाही. घोगडेवाडी येथे असा प्रकार घडतोय.
महसूल व पोलीस यांना ही माहिती देऊनही याकडे का दुर्लक्ष होतेय हे समजत नाही.
आष्टी तालुक्यातील घोगडेवाडी येथे रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन सिनापात्रातील नदीतून मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दररोज वाळू माफियांकडून उपसा केला जात आहे. हा होणारा वाळू उपसा रोखला जावा, महसूल बुडू नये म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार, पोलीस ठाणे यांना फोनद्वारे माहिती देऊनही कसलीच कारवाई होत नाही. महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी इकडे फिरकत नसल्याचे दिसत आहे.
नेमकं दुर्लक्ष का होतंय, कारवाईस टाळाटाळ का केली जातेय हे समजत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी होऊन योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.
मी तहसीलदारांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास फोन करून सविस्तर माहिती दिली. ते पथक पाठवतो म्हणले, पण कोणीच फिरकले नसल्याने आम्ही माहिती देऊनही अधिकारी कारवाई करत नाहीत, असे एका जागृत नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.