बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत असून, मुख्यालय सोडताना अवगत करत नाहीत. यासह विविध कारणांस्तव कामकाजावर परिणाम होत असून, त्यांचे निलंबन करावे, अन्यथा इतर ठिकाणी बदली करावी, अशी मागणी गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेवराई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे महसूल १ या पदावर कार्यरत आहेत. ते त्यांची कामे व्यवस्थित पार पाडत नाहीत, असा ठपका तहसीलदार खाडे यांनी ठेवला आहे, तर, महत्त्वाच्या विषयांवर दुर्लक्ष करणे, कार्यालयात अरेरावी करणे शासकीयकामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यावर त्यांना वेळोवेळी सूचना देऊनदेखील जाधवर यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी तहसीलदार सचिन खाडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यांची गंभीर दखल घेतली असून, सर्व मुद्द्यांसंदर्भात ‘कारणे दाखवा नोटीस’ जाधवर यांना पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.