गंगामसला : बांधावरून शेतरस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतात गुरूवार पासून कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी खुद्द तहसीलदार वैशाली पाटील ह्या बैलगाडीतून प्रवास करून उपोषणस्थळी पोहोचल्या आणि रस्त्याचा प्रश्न सोडवला.
गंगामसला शिवारातील जमीन गट नंबर ८३ व ८४ बांधावरून हक्कांत रस्ता खुला करून देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला होता. या निकालाची अंमलबजावणी करण्याचा आदेश असतानाही प्रश्न सुटत नव्हता. २६ जुलै रोजी सर्व अर्जदार, मंडळ अधिकारी, तलाठी हे पोलीस बंदोबस्तात हजर झाले होते. परंतु संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी हद्द बंदीच्या नसून शेतकऱ्यांनी केलेल्या खुणा आहेत. त्यामुळे अडचण असून, जेथे रस्ता करायचा आहे, तेथे पाणी असल्यामुळे रस्ता देण्याची अंमलबजावणी करता येणार नाही , असा पंचनामा केला व अर्जदाराच्या स्वतंत्र जबाबास नकार दिला होता. रस्त्याअभावी शेती वहिती करणे कठीण झाल्याने व हाेणाऱ्या अतोनात नुकसानीमुळे गुरुवारपासून गोपीनाथ खेत्री, दत्तात्रय खेत्री आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसले होते. तत्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्वतः या शेत रस्त्यावर बैलगाडीतून प्रवास करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी मंडळ अधिकारी पदमाकर मुळाटे, व्ही.एस.टाखणखार, अ. कारकुन एम.एन. साबने, तलाठी सुभाष गोरे, पोलीस बिट अंमलदार अतिशकुमार देशमुख, हे.काॅ. वाघमारे, कोतवाल गणेश खेत्री, बाळू खेत्री दाखल झाले होते. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागताच उपोषण सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
300721\save_20210730_190223_14.jpg~300721\img_20210730_163952_14.jpg