माजलगाव
: येथील तहसील कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ बाबुंना तहसीलदार वैशाली पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी उशिरा येणाऱ्या सात कर्मचाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकत सात जणांना नोटीस बजावली आहे.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयातच थांबावे, असा नियम आहे. परंतु येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी कधीही येतात आणि कधीही जातात. यामुळे नागरिकांची कामे खोळंबून राहात. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे कामचुकारांना धडा शिकविण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील सोमवारी सकाळी ९ वाजता तहसील परिसरात आल्या. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साधारणतः सकाळी पाऊणे दहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहाणे अपेक्षित असते. मात्र, या वेळेत महसूल विभाग, पुरवठा विभाग, संगणक विभाग, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना विभाग आदी विभागात अधिकारी, कर्मचारी गैरहजर जाणवले. याबाबत तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की, अनेक वेळा सांगून कर्मचारी ऐकत नसतील तर यापुढे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पावणेदहापर्यंत प्रतीक्षा, दहानंतर कारवाई
तहसीलदार पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून १० वाजता ज्या विभागातील कर्मचारी उशिरा आले. त्या विभागाच्या दालनाला टाळे ठोकले. या कारवाईमुळे कामचुकारांची चांगलीच तारांबळ उडाली. बाहेरगावाहून अपडाऊन करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांची तहसीलदार पाटील यांनी गैरहजेरी टाकत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
===Photopath===
220221\purusttam karva_img-20210222-wa0035_14.jpg~220221\purusttam karva_img-20210222-wa0037_14.jpg