धारूर : शहरातील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला मंगळवारी दुपारी येथील तहसीलदार व तालूका आरोग्य अधिकारी यांनी अचानक भेट दिली. यावेळी येथे नियुक्त वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.
धारूर शहरात दोन कोविड केअर सेंटर आहेत. यातील केज रोडवरील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला तहसीलदार वंदना शिडोळकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले व डॉ. अमोल दुबे यांनी अचानक आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी येथे नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बुजगुडे गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. डॉ. बुजगुडे हे सातत्याने गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे तहसीलदार शिडोळकर यांनी कारवाई करत डॉ. बुजगुडे यांना तत्काळ कार्यमुक्त केले. तसेच सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. तहसीलदारांच्या कारवाईमुळे तरी येथील व्यवस्थापन सुधारेल अशी आशा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.