: शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तेलगाव येथील तीन औषधी दुकाने व एका ड्रेसेसच्या शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली. यात चोरट्यांनी रोख रकमेसह अंदाजे तीस हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
धारूर तालुक्यातील तेलगाव येथे बसस्थानकासमोर लोनवळ येथील लगड बंधूंचे संस्कार मेडिकल व स्नेहल ड्रेसेसचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संस्कार मेडिकलचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानाच्या गल्ल्यात असलेली काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरली. मेडिकलमधूनच लगतच्या स्नेहल ड्रेसेसमध्ये जाण्यास दरवाजा असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा त्या दुकानात वळवत तेथील काही ड्रेस चोरून नेले. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा माजलगाव रोड परिसरात असलेल्या लगड यांच्याच दुसऱ्या मेडिकल दुकानाकडे वळवला. तेथेही गल्ल्यातील रोख रकमेवर हात मारला. याच परिसरात असलेल्या गायत्री दवाखान्याजवळ असलेले फड यांचे मेडिकल दुकान फोडले. मात्र तेथे गल्ल्यात थोडी रक्कम होती ती घेऊन चोरटे पसार झाले. या चोरीच्या घटनेची दुसऱ्या दिवशी सकाळी माहिती झाली. याप्रकरणी संबंधित औषध विक्रेत्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दिंद्रुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे, पोलीस कर्मचारी बालाजी सुरेवाड आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत चालू होती. दरम्यान संस्कार मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास दिंद्रुड ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस नाईक बालाजी सुरेवाड आदी करत आहेत.