लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटर आता बंद पडू देणार नाही. या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर माजलगाव, धारूर, चिंचवण या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातदेखील कोविड सेंटर उभारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी तेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आ. सोळंके यांच्याकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हा परिषद सभापती जयसिंह सोळंके यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करुन संबंधित अधिकारी यांना हे ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मंगळवारी सेंटरचा शुभारंभ सोळंके यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गीते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घुबडे उपस्थित होते.
या सेंटरमध्ये वीज आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. पहिल्यांदा या ट्रामा केअर सेंटरचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर करायचे होते. लाॅकडाऊनमुळे या कामाला थोडासा विलंब झाला. परंतु आज ३९ बेड आणि ऑक्सिजनची सुविधा, रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे हॉस्पिटल सुरू केले असून, जवळपास २५ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत, असेही आ. सोळंके यांनी सांगितले.
कार्यक्रमास सरपंच दीपक लगड, विठ्ठल लगड, सर्जेराव आळणे, विठ्ठल भुजबळ, दादासाहेब भंडारे, प्रा. सत्यप्रेम लगड, सर्व पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.