धारूर : धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांना संजीवनी देणाऱ्या तेलगाव ट्रामा केअर युनिटमध्ये तात्काळ ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी या भागातून होत आहे.
सध्या धारूर तालुक्याला पदाचा तालुका आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. गतवर्षी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची पदवी उत्तर अभ्यासक्रमासाठी अंबाजोगाई येथे बदली झाली. यामुळे येथील तालुका आरोग्य अधिकारीपदाचा पदभार गेल्या अनेक वर्षांपासून कागदोपत्री सुरू असलेल्या नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे.
नेमके याच काळात गेल्या महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. सध्या तालुक्यात सुरू असलेल्या अनेक मोहिमेत कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडून मास्क, सॅनिटायझर, ग्लोजसारख्या वस्तूही पुरविण्यात आलेल्या नाहीत, तर तालुक्यात तेलगाव येथील ट्रामा केअर युनिटसारखी अद्ययावत आरोग्य यंत्रणा असताना तालुका आरोग्य विभाग व प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे. या सुसज्ज इमारतीत तब्बल ४० ऑक्सिजन पॉइंट काढलेले आहेत. म्हणजेच चाळीस आॕॅक्सिजन बेड उपलब्ध आहेत.
या कोरोनाच्या महामारीत ही बिल्डिंग सध्या धूळ खात पडून आहे. यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन येथे कुठलीही सोय उपलब्ध करता येते. हा दवाखाना चालू केल्यानंतर १०० बेड उपलब्ध होऊ शकतात, तर येथे ४० ऑक्सिजन बेड अगदी सहजतेने कार्यान्वित होऊ शकतात. त्यामुळे तेलगाव व तेलगाव परिसरातील अनेक रुग्णांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
जिल्ह्यातील बीड, परळी, आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज येथील रुग्णालयातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्लांट उभा करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. यात तेलगावचे ट्रामा केअर युनिट समाविष्ट केल्यास धारूर व वडवणी तालुक्याची गैरसोय दूर होणार आहे.
===Photopath===
240421\img_20210423_214419_14.jpg