आष्टी : तालुक्यात कोरोना या महाभयंकर विषाणूने हैराण करून सोडलेले असतानाच आता सूर्यनारायणाने उग्र रूप धारण केले आहे. उन्हाचा पारा वाढल्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू आहेत. शेतकरी, शेतमजूर उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी ६ वाजताच तर सायंकाळी ४ नंतर शेतीकामाला प्राधान्य देत आहेत.
उन्हाचा पारा चढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. त्यातच विजेचा अधून मधून लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रासले आहेत. दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हात नागरिक घराच्या बाहेर न पडता घरामध्ये फॅन व कूलरची हवा घेत आहेत. मागील १० दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते ३.३० च्या कालावधीत ३८ ते ४० तापमान नोंदले जात आहे.
शेतकऱ्यांची शेतीची उन्हाळी कामे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांनी आता रबी पिकांची काढणी, मळणी केली असून आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत सुरू असून उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेताची नांगरट करून जूनमध्ये खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतात. अशातच आता कडाक्याची उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी अथवा शेतमजूर सायंकाळी व सकाळी कामाला प्राधान्य देत आहेत. काही शेतकरी सकाळी ६ लाच काम सुरू करून १० ते ११ वाजेपर्यंत काम संपवतात. परत सायंकाळी कामाला प्राधान्य देत आहेत. यातच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली असून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सवलत दिली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दीदेखील आता कमी झाली आहे. उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.