अनिल गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क कुसळंब (जि.बीड) : ‘आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते...’ या कविवर्य फ. मुं. शिंदे यांच्या ओळी मातृप्रेमाची साक्ष देतात; पण आई लेकरांना सोडून जाते तेव्हा पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात... तरीही आई लेकरांसाठी कायमच उजेड दाखवणारी समईतली जागा असते. आईची हीच आठवण जपण्यासाठी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील तीन भावांनी चक्क तिचे मंदिर बांधले आहे. सावरगाव घाट येथील शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचे १८ मे २०२२ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
असे साकारले मंदिर n मंदिरासाठी तीन भावांनी पैशांची बचत केली. याच पैशांतून १० बाय १३ जागेमध्ये मंदिराचे बांधकाम चालू केले. n सहा महिन्यांत हे काम पूर्ण झाले. पुण्यातील कातोरे नावाच्या मूर्तिकाराकडून पावणेतीन फूट उंचीची मूर्ती बनवून घेण्यात आली. n १८ मे २०२३ रोजी पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. या मूर्तीकडे पाहिले की आई समोर असल्यासारखी वाटते, अशी भावना या भावंडांनी व्यक्त केली.
आई तर गेली, पण तिला विसरणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही तिन्ही भावांनी आईचे मंदिर बांधण्याची संकल्पना मांडली. यामुळे आई रोज आपल्याला दिसेल आणि ती कायम स्मरणात राहील. पुढील पिढीसुद्धा आपल्या आईला विसरणार नाही. - राजेंद्र खाडे, मुलगा