बीड : आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात २९ नोव्हेंबरला आष्टी ठाण्यात भाजपचे आ. सुरेश धस यांच्यासह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. मात्र, महिना उलटूनही यातील एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे तक्रारदार राम खाडे यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे दाद मागितली आहे.
आष्टी तालुक्यातील आठ हिंदू देवस्थानांच्या एक हजार कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या २१२ हेक्टर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याप्रकरणी राम खाडे यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर ३२० दिवसांच्या नाट्यमय प्रवासानंतर सर्वोच्च न्यायालयाने आ. धस यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचे गुन्हा नोंदविण्याचे आदेश कायम ठेवले. त्यामुळे २९ नोव्हेंबरला आष्टी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद झाला. मात्र, महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर राजकीय दबाव असल्याचा दावा राम खाडे यांनी केला आहे. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई, अशी मागणी खाडे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. सुरेश धस यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चार पानांच्या तक्रारीत गंभीर आरोपराम खाडे यांनी अपर मुख्य सचिवांना चार पानी निवेदन दिले आहे. त्यात आ. सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने तपास यंत्रणेवर दबाव आणत आहेत. गुन्हा नोंद झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी न्यायालयीन आदेशाची पायमल्ली केली. आपल्यावर अहमदनगर जिल्ह्यात खोटा गुन्हा नोंदवून मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. एसआयटीतील आयपीएस अधिकाऱ्यास बदलण्याची खेळी देखील त्यांनी केलेली असल्याचा दावा निवेदनात केला आहे.
आठ देवस्थानांच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे. यासंदर्भात तपासासाठी आवश्यक दस्ताऐवज महसूल विभागाकडून मागविलेले आहेत. कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपातीपणे तपास करण्याचे काम सुरू आहे.- शंकर शिंदे, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड