अंबाजोगाई (बीड ) : येथील आनंद नगर भागात घरासमोर लावलेल्या टेंपोला अचानक लागलेल्या आगीत टेंपो जळून खाक झाला. हि दुर्घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता घडली. टेंपो चालकाने प्रसंगावधान राखत पेटलेला टेंपो मोकळ्या जागेत आणून उभा केल्याने संभाव्य अनर्थ टळला.
सदरील टेंपो (एमएच ४४ - ७३७९) परळी येथील समदभाई यांच्या मालकीचा असून अंबाजोगाई येथील शेख शकील हे टेंपोवर चालक आहेत. शकील यांनी सोमवारी बाहेरगावाहून आल्यानंतर टेंपो स्वतःच्या घरासमोर लावला. दुपारच्या वेळेस टेंपोमध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यावेळेस अचानकच टेंपोच्या छताला आग लागली. मुलांनी आरडाओरडा करून शकील यांना बाहेर बोलावून घेतले. घर अरुंद गल्लीत असल्याने शकील यांनी प्रसंगावधान राखत मुलांना टेंपोतून बाहेर काढले आणि पेटलेला टेंपो ग्रामीण विकास मंडळासमोरील मोकळ्या जागेत आणून उभा केला. तोपर्यंत आगीने संपूर्ण टेंपोला कवेत घेतले. अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात येईपर्यंत टेंपोचे अतोनात नुकसान झाले होते.
शेख शकील यांना अश्रू अनावर दरम्यान, स्वतःची उपजीविका असणारे वाहन डोळ्यासमोर जाळून खाक होताना पाहून टेंपो मालक शेख शकील आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तशाही परिस्थितीत पेटत्या टेंपोतून लहान मुलांना बाहेर काढत पेटता टेंपो दाट वस्तीच्या भागातून मोकळ्या मैदानात चालवत नेण्याचे प्रसंगावधान शकील यांनी दाखविले. जर अरुंद गल्लीत आग भडकली असती तर फार मोठा अनर्थ ओढवला असता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अद्याप याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.