संतोष स्वामी
दिंद्रुड : धारुर तालुक्यातील मोहखेड येथील वनविभागाच्या जंगलास रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दहा एकर वनजमीन जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. आगीच्या घटनेनंतर याकडे एकही वन अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत फिरकला नव्हता.
रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गावाच्या दक्षिण बाजूला जंगलाच्या मध्यभागी आग लागण्याची घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. लागलेली आग दिसताच व्हरकटवाडी व मोहखेड येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात आग विझविणाऱ्या काहींचे कपडे पेटले. दीड तासानंतर आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनमजूर धनंजय सोळंके, मुरलीधर व्हरकटे, अंगद वाले उपस्थित झाले. वनरक्षकाने सायंकाळी उशिरा मोहखेडच्या डोंगरावर भेट देत पंचनामा केला. मात्र, वनअधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाकडे फिरकले नाहीत.
वनसंपदेला क्षती
मोहखेड शिवारात मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल आहे. मागील तीन वर्षांपासून वनविभागाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून कडूनिंब, आवळा ,सिसू, खैर ,करंज, सीताफळ, साग, शिवन यासह अन्य झाडांची लागवड केली होती. सध्या ही झाडे पाच ते आठ फुटांपर्यंत वाढली होती. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गवतही होते. तसेच रानससे, हरिण, खोकड या प्राण्यांसह लांडोर, मोर, होला यासह अन्य पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात किलबिलाट वाढला आहे. या आगीमध्ये वन्यप्राणी मृत्युमुखी पडले का, याची माहिती मिळू शकली नाही.
जागृत ग्रामस्थांमुळे आग आटोक्यात
या आगीमध्ये जवळपास दहा एकरपेक्षा अधिक व जमीन जळून खाक झाली असल्याची स्थानिकांनी माहिती दिली. याठिकाणी जाळ पट्टी न काढल्यामुळे जमिनीचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी धावपळ करून आग विझवली नसती तर या परिसरातील मोठी वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली असती.
===Photopath===
280221\282_bed_30_28022021_14.jpg~280221\sanotsh swami_img-20210228-wa0051_14.jpg
===Caption===
मोहखेडच्या जंगलात आग लागून दहा एकरातील वनसंपदा खाक जाली. आग विझविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. ~