बीड : सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तो भरून काढण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे. गुरुवारी पुण्याहून चक्क पोलीस बंदोबस्तात दहा टन लिक्विड आणण्यात आले. यातील दोन टन जिल्हा रुग्णालयात, तर आठ टन दोन खासगी कंत्राटदारांना देण्यात आले. आता यातून जवळपास एक हजार जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांना ऑक्सिजनही लागत आहे. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने तुटवडा जाणवत आहे. जिल्हाभरात जवळपास अडीच कोटी लिटर ऑक्सिजन लागतो. एवढा ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या लिक्विडचा तुटवडा जाणवत आहे. बुधवारी २५ हजार लिटरची मागणी केली होती, परंतु केवळ १५ हजार लिटर मिळाले होते. गुरुवारी आणखी १० टन लिक्विड बीडमध्ये आले. लिक्विडचा तुटवडा आणि मागणी पाहता प्रशासनाने लिक्विड आणणाऱ्या टँकरसाठी पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता. पुण्याहून बीडपर्यंत या टँकरवर पोलिसांची नजर होती. सकाळी आठ वाजता निघालेले टँकर दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई झाल्याचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी सांगितले. नायब तहसीलदार संजय राऊत, पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे, ज्ञानेश्वर घाडगे, त्र्यंबक कुडके, आदी लोक टँकरच्या बंदोबस्तात होते. आता गुरुवारी आलेल्या १० टन लिक्विडमधून साधारण एक हजार जंबो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होईल, असेही ना. त. डोके यांनी सांगितले.
===Photopath===
220421\22_2_bed_29_22042021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात पोलीस बंदोबस्तात लिक्विड टँकर आले. बंदोबस्तातच त्यातील लिक्विड उतरून घेण्यात आले.