बीड : गायरान जमिनीतील रस्त्यालगत अंत्यसंस्कारास ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे मृतदेहाची तासभर हेळसांड झाली. अखेर बीड ग्रामीण पोलिसांनी तेथे धाव घेत मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. त्यानंतर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले. मांडवजाळी (ता.बीड) येथे १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
मांडवजाळी येथे गावालगत वायकर वस्ती आहे. त्याला चिकटूनच १० एकर गायरान जमीन आहे. तेथे काही भिल्ल समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरम्यान, येथील बबन लक्ष्मण पवार (४५) यांचा १२ सप्टेंबर रोजी रात्री शिरुर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी मांडवजाळी येथे आणला. सकाळी ८ वाजता खड्डा खोदण्यासाठी नातेवाईक गायरानातून जाणाऱ्या रस्त्यालगत गेले तेव्हा गावातील काही लोकांनी विरोध केला. त्यानंतर तिरडीवर मृतदेह घेऊन नातेवाईक तेथे पोहोचले तेव्हा रस्त्यालगत अंत्यसंस्कार करण्याच्या विरोधावर ग्रामस्थ ठाम राहिले. माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, हवालदार आनंद मस्के तेथे पोहोचले. त्यांनी दोन्ही गटाच्या लोकांची समजूत काढली. त्यानंतर ११ वाजेपासून रखडलेले अंत्यसंस्कार १२ वाजता तेथेच करण्यात आले.
....
मांडवजाळी येथे भिल्ल समाजाच्या व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वीही अंत्यसंस्कार रोखण्यात आला होता. वारंवार अशा घटना घडतात, त्या टाळण्यासाठी भिल्ल समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी.
- महादेव नरवडे, सामाजिक कार्यकर्ते
...
गायरानातून शेताकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यालगत अंत्यविधी करू नका, म्हणून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मात्र, तत्काळ पोलिसांना रवाना केले. अंत्यसंस्कार शांततेत पार पडले आणि तणावदेखील निवळला आहे.
- संतोष साबळे, पोलीस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे
...