बीड : येथील नगर पालिकेकडून शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम बुधवारी सुरू होती. शहरातील सुभाष रोडवर सार्वजनिक शौचालयाच्या समोरील १० फुट खोल व ६ फुट लांब असलेल्या मध्यवर्ती नाल्यातून जेसीबीद्वारे कचरा काढला जात होता. पहिले दोन खोरे कचरा काढल्यानंतर तिसऱ्या खोऱ्यात कचऱ्याऐवजी मृतदेहच बाहेर आला. हा प्रकार दुपारी साडे चार वाजता घडला. घटनास्थळी पालिका व बीड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेला.
बीड नगर पालिकेकडून शहरातील मोठ्या नाल्यांची १० ते १५ दिवसाला नियमित सफाई केली जात होती. बुधवारीही पालिकेचे अधिकारी, कर्मचारी हे जेसीबीच्या सहाय्याने सुभाष रोडलगत असलेल्या मध्यवर्ती नाल्याची सफाई करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास सार्वजनिक शौचालच्या समोरील कचरा काढत असताना अचानक जेसीबीच्या खाेऱ्यात पुरूषाचा मृतदेह अडकून बाहेर आला. हा प्रकार दिसताच पालिकेने स्वच्छतेचे काम थांबवले. स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांनी याची माहिती बीड शहर पोलिस आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांना दिली. त्यानंतर उपमुख्याधिकारी सम्राट कदम, कर अधीक्षक विश्वांभर तिडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही सर्व पंचनामा करून हा मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. रात्री उशिरापर्यंत हा मृतदेह कोणाचा ? याबाबत ओळख पटली नव्हती. तसेच बीड शहर पोलिस ठाण्यातही याची काही नाेंद झाली नव्हती.