बीड : शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे होत आहे. समाजातील सर्वच घटकांकडून शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त होऊन तो भावी पिढीमध्ये रुजावा म्हणून हा उपक्रम घेतला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनिअर, लेखक, शिक्षक, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. चांगले संस्कार, शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद त्यांच्यामुळे येते. सद्य:स्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग, ऑनलाईन शिक्षणातून मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा आदरणीय आणि वंदनीय गुरुजनांप्रती आदरभाव व कृतज्ञता योग्यप्रकारे कशी व्यक्त करावी, हे विद्यार्थ्यांना शिकविणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षकांप्रती प्रेम व आदर विद्यार्थ्यांना असतोच, पण तो व्यक्त होणं आवश्यक आहे. निबंध, चरित्र, वक्तृत्व, चित्र, कविता, कथेतून ते प्रभावीपणे कसे व्यक्त करावे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते कसे सर्वांपर्यंत पोहोचवावे याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी मदत करण्याचे आवाहन जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, शिक्षणाधिकारी (मा.) डॉ. विक्रम सारुक यांनी केले आहे.
-----
शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतो, योग्यप्रकारे व्यक्त होणंही आपल्यालाच त्यांना शिकवावे लागेल, एकदा संस्कार रुजला की मग समाजातील सैनिक, शेतकरी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, कलाकारांचाही यथोचित गौरव करायला ते शिकतील.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)
----------
शासनाने आयोजित केलेल्या शिक्षक कार्य गौरव स्पर्धेत विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजाने सोशल मीडियाद्वारे सहभाग नोंदवायचा आहे. मत, माहिती, निबंध, चरित्र, कथांद्वारे #ThankATeacher, #MyFavouriteTeacher, #ThankYouTeacher, #MyTeacherMyHero, #ThankATeacher2021 अपलोड करून गुरुजनांप्रती आपले मत व्यक्त करायचे आहे.