NCP Bajrang Sonwane: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबता थाबत नसल्याचं चित्र आहे. या प्रकरणातील संशयित वाल्मीम कराड हा सीआयडीला शरण आल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार हे मस्साजोग इथं मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून वाल्मिक कराड शरण येण्याआधी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोहोचला होता, असा आरोप खासदार सोनवणे यांनी केला आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. मुंडे यांच्या अनुपस्थित परळीतील त्यांचे सर्व काम हा वाल्मीक कराडच पाहात असे. त्यामुळे कराडला हत्या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता बजरंग सोनवणे यांनी कराडच्या गाडीबाबत थेट अजित पवारांवर गंभीर आरोप केला. वाल्मिक कराडने दोन दिवसांपूर्वी एका गाडीतून पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. हीच गाडी काही दिवसांपूर्वी अजित पवार मस्साजोग इथं आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात होती असं सांगून खासदार सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लागेबांधे असल्याचं सुचवलं आहे.
वाल्मीक कराडची सीआयडीकडून कसून चौकशी
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची कसून चौकशी सुरू केली आहे. एका बंदिस्त रूममध्ये त्याची गुन्ह्याच्या संदर्भाने चौकशी केली जात आहे, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात शरण आल्यावर मंगळवारी रात्री कराड याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला बीड शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले असून सीआयडी अधिकारी त्याला चौकशीसाठी दोन तास लॉकअपच्या बाहेर काढत आहेत.
बीड शहर ठाण्यात येणाऱ्यांची नोंद
बीड शहर पोलिस ठाण्यात कराड याला लॉकअपमध्ये ठेवले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव व काय काम आहे, हे विचारले जात आहे. हा डेटा दररोज संध्याकाळी सीआयडी व पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात येणार आहे.