- संजय खाकरेपरळी : मराठवाड्याचे भूषण ठरलेल्या जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 4 ची 180 मीटर उंचीची चिमणी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली. परळी शहराजवळ असलेल्या 210 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक- 4 हा आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये काढला आहे.
औष्णिक विद्युत केंद्राचे संच चालू असताना बॉयलरमधील दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार झालेला धूर हा या चिमणीतून बाहेर सोडण्यात येत असे. संच क्रमांक-4 ची 180 मीटर उंचीची चिमणी पाडण्याची प्रक्रिया आज सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली. प्रथम पोकलेनने जमिनीतील असलेली चिमणीचा भाग पाडणे सुरू केले. नंतर ब्रेकरच्या साह्याने उंच चिमणी एका बाजूने पाडण्यात आली यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी व औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षितता पाळली.
जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची 120 मीटर उंचीची चिमणी 12 सप्टेंबर 2022 रोजी अशीच जमीनदोस्त केली होती .त्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी संच क्रमांक चार ची चिमणी पाडण्यात आली .संच क्रमांक-4 बरोबरच संच क्रमांक-5 ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने स्क्रॅपमध्ये काढलेला आहे .त्याचीही चिमणी लवकरच पाडून जमीनदोस्त केली जाणार आहे .
जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात 30 मेगावॉट चे दोन संच तर 210 मेगावॉट क्षमतेचे तीन संच होते .एकूण पाच संच असलेल्या जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्राची एकूण स्थापित क्षमता 690 एवढी होती. पाचही संच स्क्रॅप मध्ये काढण्यात आलेले आहेत.या सर्व संचातून गेल्या अनेक वर्षापासून वीजनिर्मिती होणे थांबले आहे. संच क्रमांक चार हा 1987 पासून कार्यान्वित करण्यात आला होता.2019 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता . परळी तालुक्यातील दाऊतपुर व दादाहरी वडगाव शिवारातील नवीन परळी औष्णिकविद्युत केंद्रात 250 मेगावॉट क्षमतेचे तीन नवीन संच चालू आहेत.
योग्य ती काळजी घेतली या नवीन थर्मल ची एकूण स्थापित क्षमता750 मेगावॉट आहे. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 210 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 4 हा आयुर्मान संपल्यामुळे स्क्रॅप मध्ये काढलेला आहे त्या संचाची चिमणी योग्य ती काळजी घेऊन पाडण्यात आली. - अनिल काठोये ,मुख्य अभियंता परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी