- नितीन कांबळेकडा- घरी कोणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने अत्याचार केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलीच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून नराधम चुलता फरार होता. गुरूवारी सायंकाळी आष्टी येथे वकिलांकडून सल्ला घेण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.
आष्टी तालुक्यातील एका गावात आई, बापाला जिवे मारीन अशी धमकी देत पुतणीवर चुलत्यानेच अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा फुटली. पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली असल्याची धक्कादायक माहीती समोर येताच अंभोरा पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा पासून विवाहित ३० वर्षीय चुलता फरार झाला होता.
दरम्यान, गुरूवारी सायंकाळी आष्टी येथे वकिलांकडून सल्ला घेण्यासाठी आरोपी आल्याची माहिती आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली. यावरून पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस हवालदार मुद्दहर शेख यांच्यासह अंमलदारांनी आरोपींनी त्यास अटक केली.