बीड : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना अवघ्या दीड महिन्यातच पदावरून काढण्यात आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयाने शनिवारी ही कारवाई केली आहे. केज तालुक्यातील उमरी येथील कला केंद्रात महिला, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यावसायात ढकलल्याने त्यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही माहिती पक्ष कार्यालयाला मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रत्नाकर शिंदे यांच्या नावाने केज तालुक्यातील उमरी येथे कलाकेंद्र होते. तेथे कलेच्या आडून महिलांकडून देहविक्री केली जात होती. ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. यात महिला, पुरूषांना ताब्यात घेतले. तसेच काही अल्पवयीन मुलीही आढळून आल्या. त्यांनी आपले लैंगिक शोषण झाल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यानंतर जिल्हाप्रमुख शिंदे यांच्यासह ३६ जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. हाच धागा पकडून शिवसेना पक्षाने शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे.