मुख्यमंत्र्यांनी विचारले पैसे मिळाले का?शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज केले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:10 PM2024-08-22T19:10:55+5:302024-08-22T19:11:47+5:30
खात्यात दोन हजारांचा हप्ता अन् ई-पीक पाहणीची अट रद्द झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
परळी (बीड): येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर ९१ लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे मिळाले का? असे विचारताच कार्यक्रम स्थळी बसलेल्या शेतकऱ्यांनी खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज थेट मंत्र्यांना त्यांच्या पीए मार्फत पाठवत दुजोरा दिला.
बुधवारी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.
त्याचबरोबर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची घातलेली अट मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रद्द करत असल्याचे जाहीर केले. याचा दुहेरी आनंद झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांचे आभार मानणारे मेसेजेस धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांकडे पाठवले व आपले मेसेज मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना शेतकऱ्यांनी पाठवलेले ते मेसेज दाखवले असता त्यांनी समोर बसलेल्या शेतकऱ्यांना हात उंचावून दाद दिली. खात्यात दोन हजारांचा हप्ता अन् ई-पीक पाहणीची अट रद्द झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.