संतोष स्वामी दिंद्रूड (जि. बीड) : पहिली चप्पल खराब झाली. त्यामुळे नवी चप्पल घेण्यासाठी आजीकडे हट्ट धरला. परंतु तो पूर्ण न केल्याने अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने आजीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे सोमवारी सायंकाळी घडली.
युवराज श्रीमंत मोरे (रा. बोडखा कासारी, ता. धारूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे तो आजोळी हिंगणी खुर्द येथे विश्वनाथ उजगरे या आजोबांकडे आला होता. युवराजचा स्वभाव हा चिडचिडा आणि रागीट असल्याचे सांगण्यात आले. सोमवारीही सकाळपासूनच त्याने चिडचिड करायला सुरुवात केली होती. त्याचे आई-वडील हिंगणीपासून अवघ्या दोन किती अंतरावर ऊसतोडणी करीत होते. त्यांच्याकडे जातो म्हणून तो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडला आणि जवळच असलेल्या लिंबाच्या छोट्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
लहान मुलांमध्ये हट्टीपणा असतो. हट्ट पुरविला नाही तर ते चिडचिड करतात, रागीट बनतात. अशा मुलांना ‘इम्पलसिव डिसऑर्डर व बिहेव्हिअरल डिसऑर्डर’ असा आजार असू शकतो. मुलांची वर्तणूक, चिडचिडेपणा, राग येणे, स्वत:सह इतरांना इजा करणे अशी लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. मोहमंद मुजाहेद, मानसोपचारतज्ज्ञ, बीड