माजलगाव : येथील नगर पालिकेच्या जेसीबीने स्वच्छतेच्या नावाखाली जेसीबीने भिंत पाडली. याच भिंतीखाली एक सात वर्षाची चिमुरडी दबली गेली. परंतू हे चालकाला दिसले नाही. त्याने पुन्हा त्याच ढिगाऱ्यावर खोरे फिरवून हा ढिगारा दाबला. यात या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव शहरातील इदगाह मोहल्ला परिसरात गुरूवारी दुपारी चार वाजता घडली. या घटनेनंतर जेसीबीवर नागरिकांनी दगडफेक केली.
सय्यद इक्रा सय्यद निसार (वय ७ रा.इदगाह मोहल्ला, माजलगाव) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. माजलगाव शहराच्या मधोमध इदगा मोहल्ला असून या ठिकाणी एक मोठी मस्जिद आहे. येथे कसल्याही प्रकारची अस्वच्छता नाही. तसेच मस्जिदमध्ये जेसीबी जात नाही. परंतू नवीन चालक असल्याने त्याने जेसीबी आत घालण्याचा प्रयत्न केला. यात बाजूची एक भिंत पडली. याच भिंतीखाली खेळणारी इक्रा आली. हे सर्व चालकाच्या लक्षात आले नाही. त्याने पडलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करून तो खोऱ्याने दाबला. परंतू रक्त दिसल्याने त्याने जेसीबी तेथेच सोडून पळ काढला. त्यानंतर बाजूच्या लोकांनी धाव घेत ढिगारा बाजूला सारून मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू खोऱ्याने दाबल्याने मुलीचा चेहरा आणि पोटाचा चेंदामेंदा झाला होता.
दरम्यान, या गंभीर प्रकाराने मोहल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील लोकांनी जेसीबीवर दगडफेक करून काचा फोडल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
विनाक्रमांकाची जेसीबी अन् चालकही नवीनच
स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या जेसीबीला क्रमांक नव्हता. हीच जेसीबी पालिकेतीलच एका अधिकाऱ्याच्या भावाची असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जेसीबीवरील चालक नवीन होता. त्यामुळेच त्याच्याकडून ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदरील जेसीबी याठिकाणी का पाठवण्यात आली व ही जेसीबी कोणाची आहे, ही माहिती घेण्यात येईल- निलम बाफना, प्रशासक नगरपरिषद माजलगाव