बीड : एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. १४३ धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव धरणासह ५४ प्रकल्प मृतसाठ्यात गेले असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस येणे आवश्यक आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने अनेक गाव-वाड्या, तांड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ६ लाख ४३ हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या १० मे रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३८२ टँकरच्या माध्यमातून ११ तालुक्यांतील ६ लाख ४३ हजार १०२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी पाऊस झाला, परंतु धरणक्षेत्र परिसरात झाला नाही. धरणात पाणीसाठा झाला तर आसपासच्या गावांतील जमिनीतील पाणीपातळी वाढलेली राहते. धरणांमध्ये पाणीसाठा झाला नसल्याने धरण परिसरातील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. आता ज्या ठिकाणी जलस्रोत शिल्लक आहे त्याच ठिकाणावरून पाणीउपसा केला जात आहे. सद्यस्थितीला जवळपास सर्व धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे. ही बीड जिल्हावासीयांसाठी चिंताजनक बाब आहे.
हवामान विभागाच्या अंदाजामुळे दिलासाहवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ मे रोजी माॅन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ७ जून पूर्वीपासूनच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आले. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
५२ प्रकल्प पडले काेरडेबीड जिल्ह्यातील १४३ पैकी ५२ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५४ पाणी प्रकल्प जोत्याखाली आहे. तसेच २७ प्रकल्पामध्ये २५ टक्के, ७ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पामध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरड्या पडलेल्या पाणी प्रकल्पातून पाणी काढता येणे शक्य नाही, परंतु जी प्रकल्प जोत्याखाली आहेत, त्यातून थोडाफार पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो.
उपयुक्त पाणीसाठा ४.७२ टक्केचधरणे मृतसाठ्यात असली तर त्यातील थोडाफार पाणीउपसा केला जाऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये आज रोजी ४.७२ ऐवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील १०.६०६ एवढा दलघमी प्रत्यक्ष पाणीसाठा आहे. त्यातून काही दिवस बीडकरांची तहान भागवली जाऊ शकते. पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील काळात फारशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही असा विश्वास अनेकांना आहे. मे अखेरपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत असल्याचे अनुभव अनेकांना आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता देखील कमी होईल व पाण्याची चिंता मिटेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
प्रकल्प -संख्या-जोत्याखाली-कोरडेमाजलगाव प्रकल्प -१-०मध्यम -५-३लघु -४८-४९एकूण- ५४-५२