परळी: येथील मथुरा मल्टी सर्व्हिसेसचे चालक सचिन पोखरकर (४०) यांचा गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी - गंगाखेड मार्गावरील रेल्वेरुळाजवळ सिमेंट फॅक्टरी परिसरात मृतदेह आढळून आला. या परिसरात त्यांची दुचाकीही पोलिसांना दिसून आली आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, सचिन पोखरकर यांनी आत्महत्या केली की घात झाला या विषयी चर्चा सुरू आहे.
गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश तोटेवाड, जमादार पवार व वाहन चालक मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन पोखरकर यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणण्यात आला. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ सचिन पोखरकर यांचे मथुरा मल्टी सर्विसेस नावाने दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी,आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. लोकमत सखीमंच परळीच्या प्रमुख सुचिता पोखरकर यांचे ते पती होत. दरम्यान, ही आत्महत्या असावी असा अंदाज परळी ग्रामीण पोलीसानी व्यक्त केला आहे. वैद्यनाथ मंदिराजवळील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.