ग्राऊंड रिपोर्ट
नितीन कांबळे
कडा : आई खाऊ घालेना अन् बाप भीक मागू देईना... अशी म्हण आपण ऐकतो; पण अगदी याच म्हणीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मुबलक पाणी, हजारो रुपये खर्च करून, उसनवारी करून उसाची लागवड केली. रात्रीचा दिवस केला, ऊस जगवला आणि आता उसाला तोड येईना. कारखाना ऊस घेऊन जाईना. ऊस वाळायला लागला तरी कारखाना घेऊन जात नसल्याने आता ऊस फडातच पेटवावा, की प्रशासनाच्या दारात आणून टाकावा, हेच कळत नसल्याचे तालुक्यातील तागडखेल येथील ऊस उत्पादक शेतकरी संजय जपकर यांनी सांगितले. जपकर यांच्याप्रमाणेच रुई नालकोल, शिराळ, सराटे वडगाव, मेहकरी, कानडी, शिरापूर, दादेगावसह अन्य गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना बंद असला तरी, नगर जिल्ह्यातील कारखाने जवळपास असल्याने शेतकरी दरवर्षी पाण्याचे नियोजन करून उसाची लागवड करतात; पण यंदा उसाची खूप दयनीय अवस्था आहे. याबाबत शेतकऱ्यांचे वास्तव बांधावर जाऊन जाणून घेतले असता, विदारक सत्य समोर आले आहे. उसाची लागवड करताना उसनवारी, कधी-कधी कर्ज काढायचे, घरातील किडुकमिडुक मोडून लागवड करायची. जिवावर उदार होऊन रात्रीचा दिवस करीत पाणी द्यायचे. ऊस जगवायचा; पण हा पोटाला चिमटे देऊन जगवलेला ऊस गाळपासाठी तयार असताना व कारखान्याला १०० किलोमीटर अंतरावरील ऊस घेऊन जाण्याचे नियम असताना, आज ऊस वाळायला लागला आहे. तरी तोड येईना, कारखाना घेऊन जाईना. या समस्येकडे राजकीय नेते, पुढारीदेखील लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नसल्याने आता हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल, असे चित्र दिसत असल्याने हा ऊस फडातच पेटवावा, की प्रशासनाच्या दारात आणून टाकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आमचं वास्तव सरकारला दाखवा
राजकीय नेत्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत लक्षात घेता, विद्यमान आमदारांनी वीस, माजी आमदारांनी दहा, जिल्हा परिषद सदस्यांनी दोन, तीन शेतकऱ्यांचा ऊस जर गाळपासाठी मार्गी लावला, तरी आमचं समाधान होईल; पण आमचं हे वास्तव शासनाला दाखवा, अशा भावना ‘लोकमत’जवळ ऊस उत्पादक शेतकरी संजय जपकर यांनी व्यक्त केल्या.