अंबाजोगाई (बीड) : सुनेस रॉकेल टाकुन पेटवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांनी बुधवारी ठोठावली. रतन राजाराम कसबे व नंदुबाई रतन कसबे ( रा.उंबरी ता. केज ) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेची माहिती अशी की, सोनालीचा विवाह ऑक्टोबर २०१७ साली विकास रतन कसबे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरा रतन व सासु नंदुबाई हे सतत सुन सोनाली हिच्याशी विविध कारणांवरून भांडत असत. सततच्या भांडणामुळे सोनाली दिड महिने माहेरी राहिली. त्यानंतर सोनालीस वडीलांनी सासरी आणून सोडले होते. दरम्यान, दि. ७ जून २०१८ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झोपेतून उशिरा उठण्याच्या कारणावरून सासरा रतन व सासु नंदुबाई सोनालीस भांडू लागले. तेवढयात सासु नंदुबाई हिने सोनालीच्या अंगावर रॉकेल टाकले तर सासरा रतनने आग लावली. या दुर्घटनेत सोनाली गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिचा पोलीसांनी जवाब नोंदविला. ती ९४ टक्के भाजल्याने तिचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.
सोनालीच्या मृत्यूपूर्व जवाबानुसार केज पोलीस ठाण्यात सासरा रतन राजाराम कसबे व सासु नंदुबाई रतन कसबे या दोघांच्या विरुद्ध गु.र.नं. २४२ / २०१८ कलम ३०२, ३०४-ब, ४९८-अ, ३४ भा.द.वी गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक करून दोषारोप दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश डी.डी.खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. कदम यांनी केला होता. तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.