बीड : राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात नुकतेच सामील झालेले अमर नाईकवाडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. यात आपले राजकीय विरोधक हे सत्तेचा दुरुपयोग करून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करीत आ. क्षीरसागरांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी सोमवारीच पोलीस अधीक्षकांची भेटही घेतल्याचे सांगण्यात आले. या पोस्टने मात्र राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अमर नाईकवाडे यांच्यासह पाच लोकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी नाईकवाडे यांनी आ. क्षीरसागर यांच्यावर एकेरी भाषेत कडाडून टीका केली होती. आ. संदीप क्षीरसागर हे टक्केवारी घेतात, असा थेट आरोपही केला होता. याच सर्व गोष्टींचा राग मनात धरून काही सत्ताधारी आपल्यावर सूडभावनेने खून, खुनाचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी तसेच बलात्कारासारख्या घाणेरड्या आरोपात गोवण्याचे षडयंत्र करीत असल्याचे म्हणत नाव न घेता आ. क्षीरसागरांवर टीका केली आहे.
या सर्व गोष्टींची कुणकुण लागल्याने त्यांनी सोमवारी सकाळीच पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आपल्याला खाेट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी जर खराच दोषी असेल तर कारवाई करावी, परंतु खोटे गुन्हे दाखल होण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याचे निवेदनही एसपींना देण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, मोईन मास्टर, बाबू लोढा, शुभम धूत आदींची उपस्थिती होती. या प्रकाराने मात्र राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.