धारूर (बीड) : तालुक्यातील घागरवाडा साठवण तलावाच्या गेटचे कुलूप तोडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी ( दि. २४ ) घडला आहे. अज्ञाताने केलेल्या या कृत्याने शेती, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठाप्रमाणावर अपव्यय झाला असून उन्हाळ्यात याची झळ दहा गावातील ग्रामस्थांना बसणार आहे.
चांगला पाऊस झाल्याने यंदा घागरवडा साठवण तलावात पाण्याचा साठा चांगला झाला होता. उन्हाळ्यात शेती आणि पाण्यासाठी जवळपास १० गावातील ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, मंगळवारी रात्री अज्ञाताने संरक्षक साखळी तोडत गेटची तोडफोड करत पाणी नदीपात्रात सोडले. मंगळवारपासून गेटमधून पाणी नदीपात्रात वाहत आहे. ही संतापजनक घटना आरणवाडी येथील भागवत शिनगारे व वंचित विकास आघाडीचे बाबूराव मस्के यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, या प्रकारामुळे 0.65 मी. ने पाणी पातळी कमी झाली आहे. शिवाय रस्ता, इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विनाकारण अमुल्य पाणीसाठी नदीपात्रात सोडल्याने ग्रामस्थांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल का याची चिंता सतावत आहे. तसेच उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू शकते. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले तलावाच्या गेटची साखळी काढून पाणी सोडण्यात आलेला प्रकारास पाटंबंधारे विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. देखरेखची जबाबदारी असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करावी. तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.