- संजय खाकरेपरळी: तालुक्यातील जिरेवाडी बायपास रस्त्यावर एका नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी ठेवलेल्या पाईपला धडकून कार खड्ड्यात कोसळून रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता अपघात झाला. या अपघातात शहरातील प्रसिद्ध डॉ. वाल्मीक मुंडे हे जागीच ठार झाले. तर डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत. जखमी डॉ. खाडे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत कमी दरात रुग्णसेवा करणारे डॉ. मुंडे यांच्या मृत्यूने तालुक्यातील गरीब रुग्णांसाठीचा आरोग्यदूत हरल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
जिरेवाडी बायपास रोडवर गावालगत एका ठिकाणी नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी प्रगतीपथावरील कामाचा कोणताही दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. तसेच नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना अनेक वाहनधारकांना अडचणी येत आहेत. याच रस्त्यावरून डॉ. प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने जिरेवाडीकडे रविवारी रात्री अकराच्या सुमारास येत होते. नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावर पडलेल्या पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली. यात डॉ. मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. खाडे हे जखमी झाले आहेत.
गरीब रुग्णांचा आरोग्यदूत हरपलाडॉ. वाल्मीक मुंडे हे अनेक वर्षांपासून शहरात नाममात्र दरात रुग्णांची सेवा करीत होते. त्यामुळे परळी तालुक्यात लोकप्रिय झाले होते. त्यांचे मूळगाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
अपघातास गुत्तेदार आणि प्रशासन कारणीभूतगेल्या काही दिवसात जिरवाडी बायपास रस्त्यावर तिघांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच मोटर सायकल व ऑटो रिक्षांचे अनेक अपघात झाले आहेत. बायपास रस्ता पूर्ण झाला आहे. परंतु नाला काम मागील काही महिन्यापासून रखडल्याने रस्त्यावर अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गरीब रुग्णांसाठी आरोग्यदूर ठरलेल्या डॉ. मुंडे यांच्या मृत्यूस प्रशासन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.