बीड : एक कोटी रूपयांची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि याच विभागातील सहायक फौजदार आर.बी.जाधवर यांना शोधण्यासाठी मदत करावी, म्हणून एसीबीने पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. अधीक्षकांनी ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली आहे. कुख्यात दरोडेखोर, चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी एलसीबी आपल्याच विभागातील पोलिस निरीक्षकाला बेड्या ठोकणार का? याकडे लक्ष लागले आहे.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. सहायक फौजदार आर.बी.जाधवर याने त्याला प्रोत्साहन दिले होते. पहिला हप्ता ५ लाख रुपये घेताना कुशल जैन या खासगी व्यक्तीला पकडले होते. या प्रकरणात खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने बीडच्या एसीबीने शनिवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पत्र देऊन खाडे आणि जाधवर यांना अटकेसाठी मदत करावी, अशी मागणी केली आहे.
यावर अधीक्षक ठाकूर यांनी ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली आहे. आता एलसीबीला यात किती यश येते? हे वेळच ठरवेल. तपासाच्या अनुषंगाने एलसीबी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांना विचारले असता, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी फोन न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही
खाडेच्या घरात कोट्यवधींचे घबाडबीडच्या एसीबीने खाडे आणि जाधवर यांच्या घराची झडती घेतली होती. यात मोठे घबाड हाती लागले. खाडे याच्या घरात रोख १ कोटी ८ लाख रुपये, ९७ तोळे सोने आणि साडे पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला. तर जाधवरच्या घरातही रोख रकमेसह २५ तोळे सोने सापडले होते.