बीड : दोन कोटींच्या चंदनाची तस्करी करताना केज-धारूर रोडवर पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, यातील मुख्य आरोपी बालाजी जाधव हा शरद पवार गटाचा नगरसेवक असून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा समर्थक आहे. अजूनही तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. परंतू जाधव याच्या चंदन चोरीच्या प्रकरणावरून विरोधकांनी सोनवणेंना कोंडीत पकडले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांना चंदनाच्या गाभ्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती रविवारी रात्री मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून एक टेम्पो पकडला. यात जवळपास १२०० किलोपेक्षा अधिक चंदनाचा गाभा सापडला. याची किंमत १ कोटी ९७ लाख एवढी होती. तसेच २० लाखांचा टेम्पोही पकडला. यामध्ये चालक प्रितम काशीनाथ साखरे (वय ३४ वर्षे, रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई), शंकर पंढरी राख (रा.कौडगाव) या दोघांना जागेवरूनच अटक केली होती. तर बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव (वय ४२ वर्षे रा.केज) याच्या सांगण्यावरून हे चंदन जालन्याला नेले जात असल्याचे दोन्ही आरोपींनी सांगितले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
दरम्यान, बालाजी जाधव सराईत चंदनचोर आहे. कारण यापूर्वीही त्याच्याविरोधात अंबाजोगाईतील बर्दापूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आता देखील त्याचा केजच्या प्रकरणात सहभाग आढळला आहे. तो केज नगर पंचायतमध्ये नगरसेवक असून बजरंग सोनवणे यांचा कार्यकर्ता आहे. सध्या सोनवणे यांच्या प्रचारात तो सक्रीय होता.
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्यासाउथच्या 'पुष्पा' चित्रपटात टेंपो, ट्रक आणि टँकरमधून लाल चंदनाची तस्करी दाखवण्यात आली आहे. अशाच प्रकारची घटना केज तालुक्यात घडली. येथून जालन्याला चंदनाचा गाभा घेऊन जाणारा आयशर टेंपो बीड गुन्हे शाखा आणि केज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी पहाटे केजजवळ पकडण्यात आला. यावेळी टेंपोत ६० गोण्यात तब्बल १ हजार २३५ किलो चंदन आढळून आले. बाजार भावानुसार याची किंमत १ कोटी ९७ लाख ६८ हजार रुपये आहे. पोलियांनी चंदनासह २० लाख ६३ हजार रुपयांचा आयशर टेंपो, असा एकूण २ कोटी १८ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.