बीड : शहरातील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचे लग्न एका तरुणाशी लावून देत त्या बदल्यात एक लाख रुपये घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडितेच्या पित्याच्या फिर्यादीवरून आईसह जावई, सासूविरोधात पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. तो आता चकलांबा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
बीड शहरातील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचा विवाह शिरूर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत २९ जुलै २०२० रोजी लावून दिला होता. त्या बदल्यात त्याच्याकडून मुलीच्या आईने एक लाख रुपये घेतले. त्यानंतर मुलाने अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवले. तसेच सासूने पीडित मुलीस तुला आम्ही एक लाख रुपयांना विकत घेतले आहे, तुला घरातील सगळी कामे करावी लागतील, असे म्हणून वारंवार छळ केला.
या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या तिच्या वडिलांकडे धाव घेतली. याप्रकरणी त्या पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पुणे येथील वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो, बालविवाह प्रतिबंध व ३७६ कलामांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.