- नितीन कांबळे कडा (बीड) : प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मृत्युशय्येवर असतानाही डॉक्टर पती-पत्नीने उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने मातेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आष्टी येथे घडली. मंदा नितीन थोरवे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर दांपत्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पती नितीन थोरवेने पोलीस ठाण्यात केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आष्टी तालुक्यातील पुंडी येथील नितीन थोरवे याची पत्नी मंदा थोरवे ( २९) प्रसूतीसाठी पोकळे हाॅस्पीटलमध्ये गुरुवारी दुपारी दाखल झाल्या. रात्री साडेआठला त्यांना मुलगा झाला. मात्र प्रकृती ठीक नसल्याने बाळाला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा नितीन यांनी पत्नीच्या तब्येतीची चौकशी केली. डॉक्टर त्या व्यवस्थित असल्याचे सांगितले. मात्र, दीड तासातच मंदा यांची प्रकृती ढासळली. नितीन यांनी तसे डॉक्टर पती-पत्नीला सांगितले. मात्र, ते इतर कामात व्यस्त होते. काहीवेळाने मंदा यांना नगरला अधिक उपचारासाठी घेऊन जा असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारासाठी घेऊन जात असताना मंदा यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
दरम्यान, डॉ. सुवर्णा पोकळे, डॉ. आदिनाथ पोकळे यांनी उपचारात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार नितीन किसन थोरवे यांनी आष्टीचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्याकडे केली आहे. तसेच या तक्रारीच्या प्रति मेडिकल कौन्सिल मुंबई, पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस कार्यालय आष्टी यांना दिल्या आहेत. शोकाकुल वातावरणात शुक्रवारी त्या महिलेचा अंत्यविधि करण्यात आला आहे.