बीड : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात आरोग्य विभागाचेही कर्मचारी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या संपात अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील चालकही सहभागी झाल्याने प्रवास करण्याची अडचण त्यांच्यासमोर झाली आहे.
मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांना बोलावले होते. परंतू चालक नसल्याने त्यांना पायपीट करत जिल्हा परिषद गाठावी लागली. चालक नसल्याने त्यांचे वाहन कार्यालयाच्या बाहेर उभा होते. दरम्यान, आरोग्यातील काहीच कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा समाप्तीचा इशारा दिल्याने कंत्राटी कर्मचारी संपापासून दुर राहिल्याचे दिसत आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनेंद्र बागलाने, उपाध्यक्ष वसंत सानप यांच्यासह इतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी जिल्हा परिषदेसमोर आज सकाळी आंदोलन केले.
जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा सुरळीत
जिल्हा रूग्णालयातील ओपीडी व आयपीडीतील आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे दिसले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संतोष शहाणे यांच्यासह अनेक डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सेवेबाबत नियोजन केले होते. जिल्हा रूग्णालयासमोरही काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.